आता खासगी वाहनांवर 'पोलिस' लिहिल्यास होणार कठोर कारवाई; महासंचालकांचे कडक आदेश
आता खासगी वाहनांवर 'पोलिस' लिहिल्यास होणार कठोर कारवाई; महासंचालकांचे कडक आदेश
नांदेड (Nanded Darpan News): अनेकदा रस्त्यावरून धावणाऱ्या खासगी वाहनांवर, कारवर किंवा दुचाकींवर लाल रंगात 'पोलिस' (Police) असे लिहिलेले किंवा पोलिसांचा अधिकृत लोगो लावलेला आपण पाहतो. मात्र, आता यापुढे खासगी वाहनांवर बेकायदेशीरपणे 'पोलिस' नाव लिहिणे किंवा लोगो लावणे चांगलेच महागात पडणार आहे. अशा प्रकारचा गैरवापर रोखण्यासाठी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी कठोर पावले उचलली असून, आता थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी वाहनांवर 'पोलिस' लिहून नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून, या नावाचा धाक दाखवून बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत हे नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत.
🚨 वरिष्ठ पातळीवरून कडक निर्देश
या संदर्भात अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महामार्ग पोलिस अधीक्षकांना मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नव्या आदेशानुसार, कोणत्याही खासगी वाहनावर 'पोलिस' असा उल्लेख आढळल्यास ते वाहन जप्त करण्यासोबतच कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.
⚠️ अवैध कामे आणि दहशतीसाठी वापर
खासगी वाहनांवर 'पोलिस' लिहून त्याचा वापर अवैध धंदे, हप्तेवसुली, अवैध प्रवासी वाहतूक आणि सर्वसामान्यांवर दहशत बसवण्यासाठी केला जात असल्याच्या धक्कादायक तक्रारी समोर आल्या आहेत. या पाट्यांमुळे गुन्हेगार आणि असामाजिक घटक पोलिसांचे नाव सांगून गैरफायदा घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
काही महाभागांनी तर 'पोलिस' नाव किंवा लोगो लावून सर्रासपणे बेकायदेशीर प्रवासी आणि मालवाहतूक सुरू केली आहे. पोलिसांची गाडी समजून तपासणी यंत्रणा आणि आरटीओ अशा वाहनांकडे अनेकदा दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट फायदा व्यावसायिक कारणांसाठी घेतला जात आहे.
तुमच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट आहे का? नांदेड RTO चे नियम आणि दंडाची तरतूद; सविस्तर वाचा
🛑 नाकाबंदी आणि पेट्रोलिंगमध्ये मिळते सूट; सुरक्षेला धोका
नाकाबंदी किंवा रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या अशा 'पोलिस' पाटी असलेल्या वाहनांची सहसा तपासणी केली जात नाही. पोलिसांची गाडी समजून त्यांना सोडून दिले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या नाक्यांवर अशा वाहनांना मिळणारी सूट ही एक अत्यंत गंभीर आणि धोक्याची बाब ठरत आहे.
👥 नातेवाईक आणि मित्रांचाही सुळसुळाट
अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या मालकीच्या खासगी कार आणि दुचाकींवर लाल रंगातील 'पोलिस' पाटी तसेच अधिकृत लोगो लावून फिरताना दिसतात. एवढेच नाही तर, पोलिस सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची मुले, पत्नी, नातेवाईक आणि मित्रपरिवारही स्वतःच्या खासगी गाड्यांवर 'पोलिस' पाटी लावून मिरवतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंडापासून वाचण्यासाठी या पाटीचा सर्रासपणे गैरवापर केला जातो.
🎯 थेट कारवाईची मोहीम
या सर्व गैरप्रकारांची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता धडक मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेद्वारे सर्व खासगी वाहनावरील 'पोलिस' नाव आणि लोगो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर तसेच पोलिसांच्या नातेवाईकांवर आता थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
📢 नांदेडमधील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी 'नांदेड दर्पण' ला फॉलो करत राहा.

No comments:
Post a Comment