--:-- | नांदेड हवामान: -- °C
ठळक बातम्या
बातम्या लोड होत आहेत...
Nanded Darpan Logo - नांदेड दर्पण
Join us

गँगवॉरने नांदेड पुन्हा अशांत! दूध डेअरी भागात पेट्रोल पंपावर तरुणाची हत्या, बाफना परिसरात एकाचा निर्घृण खून

नांदेड हादरले! २४ तासांत दोन निर्घृण खून; एकाला दगडाने ठेचले, तर दुसऱ्यावर खंजरने सपासप वार

स्थान: क्राईम डेस्क / विशेष प्रतिनिधी • संदर्भ: लोकमत • संपादन: नांदेड दर्पण
विषय: क्राईम अलर्ट, गँगवॉर, हत्या, नांदेड पोलीस

नांदेड: शहरात अवघ्या २४ तासांत खुनाच्या दोन थरारक घटना घडल्याने संपूर्ण नांदेड शहर हादरून गेले आहे. बाफना परिसरात एका अनोळखी इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर या घटनेची चर्चा सुरू असतानाच दूध डेअरी भागातील पेट्रोल पंपावर 'गँगवॉर'मधून एका तरुणावर खंजिराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

🛑 घटना पहिली: बाफना परिसरात दगडाने ठेचून हत्या

  • शनिवारी सकाळी बाफना परिसरातील 'संगम कार बाजार' हे दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याला दुकानासमोरच रक्ताच्या थारोळ्यात एक इसम मृतावस्थेत आढळून आला.
  • मृताच्या डोक्यावर दगडाने वार करून गंभीर दुखापत केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
  • प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेजमधून मृताचा अन्य तिघांसोबत वाद झाल्याचे दिसत आहे. मयत हा भंगार गोळा करणारा असण्याची शक्यता असून, त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यासाठी भंगार विक्रेत्यांकडेही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

⚔️ घटना दुसरी: दूध डेअरी परिसरात खंजिराने सपासप वार

बाफना परिसरातील हत्येचा तपास सुरू असतानाच शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास दूध डेअरी परिसरातील पेट्रोल पंपावर दुसरी खुनाची घटना घडली. इंदरसिंग बावरी हा तरुण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता, अज्ञात तीन ते चार जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी खंजिराने सपासप वार केल्याने बावरी गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृताच्या नातेवाईकांची आक्रमक भूमिका

इंदरसिंग बावरी याचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.

केबी गँगच्या सदस्यांवर संशय

दूध डेअरी परिसरातील हत्येमागे गँगवॉरचा अँगल असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही दिवसांपूर्वी 'केबी गँग' मधील काही सदस्य तुरुंगातून बाहेर आले होते. जुन्या वादातून ही हत्या झाली का, याचाही तपास करण्यात येत आहे.

शनिवार रात्री उशिरापर्यंत या दोन्ही प्रकरणांत कुणालाही अटक झाली नव्हती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगाने फिरू लागली आहेत.

— दैनिक नांदेड दर्पण (क्राईम डेस्क)
CRIME SCENE DO NOT CROSS 🚧 CRIME SCENE DO NOT CROSS 🚧 CRIME SCENE DO NOT CROSS 🚧 CRIME SCENE DO NOT CROSS 🚧

ग्राफिक्स: शहरात २४ तासांत घडलेल्या दोन खुनांमुळे खळबळ

प्रतिक्रिया द्याय्य (Comments)

No comments:

Post a Comment

तक्रार नोंदवा