आता हायवे होणार सेफ! सुप्रीम कोर्टाचा दणका: महामार्गांवरील बेकायदा ढाबे, हॉटेल्स आणि अतिक्रमणे ६० दिवसांत पाडणार
आता हायवे सेफ होणार! सुप्रीम कोर्टाचा दणका: महामार्गांवरील बेकायदा ढाबे, हॉटेल्स ६० दिवसांत पाडणार
नांदेड: राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाच्या हद्दीत थाटलेले सर्व बेकायदा ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत पाडण्याचे व नवीन बांधकामांवर बंदी घालण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दुकाने, हॉटेल्सवर गर्दी; अपघात आणि वाहतूक कोंडी
महामार्गाच्या कडेला असलेल्या बेकायदा ढाब्यांवर व हॉटेल्सवर होणारी वाहनांची पार्किंग आणि गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि निष्पाप प्रवाशांचे जीव जातात. यामुळेच महामार्गाच्या हद्दीत आधीपासून उभारण्यात आलेली सर्व अनधिकृत व बेकायदा बांधकामे हटवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
📜 काय म्हटले आहे निर्देशात?
🚧 अडथळे दूर करा
- वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी रस्ता हद्दीतील सर्व अडथळे दूर करण्यात यावेत.
- नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जावी.
🚫 व्यावसायिक बांधकामाला बंदी
- महामार्गाच्या हद्दीत कोणत्याही नवीन ढाब्याला किंवा व्यावसायिक बांधकामाला पूर्णपणे बंदी.
- कोणत्याही कायदेशीर बांधकामासाठी राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग प्राधिकरणाची पूर्वमंजुरी घेणे बंधनकारक.
स्थापन होणार 'महामार्ग सुरक्षा कृतीदल'
आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे राहावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष 'महामार्ग सुरक्षा कृतीदल' स्थापन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत कडक निर्देश देण्यात आले असून, बेकायदा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment