--:-- | नांदेड हवामान: -- °C
ठळक बातम्या
बातम्या लोड होत आहेत...
Nanded Darpan Logo - नांदेड दर्पण
Join us

नव्या पोलिस अधीक्षकांची 'सुपर ३०' डेज कामगिरी!

नव्या पोलिस अधीक्षकांची 'सुपर ३०' डेज कामगिरी!

एसपी डॉ. निलाभ रोहन यांच्या धडक कारवाया; एका महिन्यात तब्बल १६ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (विशेष वृत्त)

जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या एका महिन्यातच डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. "जिल्ह्यात अवैध धंदे अजिबात चालणार नाहीत," असा थेट इशारा देत नव्या एसपींच्या नेतृत्वात नांदेड पोलिसांनी महिनाभरात तब्बल १६ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या बदलीनंतर २४ जून रोजी डॉ. निलाभ रोहन यांनी नांदेडचा पदभार स्वीकारला होता. पदभार घेताच गुन्हेगारी नियंत्रण, महिला सुरक्षा आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सर्व ठाणे प्रमुखांना कडक सूचना दिल्या होत्या.

📊 महिन्याभरात जप्त केलेला मुद्देमाल:

अ.क्र. गुन्ह्याचे प्रकार जप्त मुद्देमाल / किंमत
रेती (वाळू तस्करी) ₹ १४,१९,३७,६६४/-
गुटखा ₹ ६०,८९,२४६/-
जुगार ₹ ४९,१०,३५०/-
दारूबंदी ₹ २६,३१,७९०/-
अंमली पदार्थ ₹ २५,७१,९५०/-
शस्त्र अधिनियम (3/25, 4/25) ०६ पिस्तूल, ०२ मॅगझीन, १७ तलवार/खंजीर/कुकरी
पाकिस्तान निर्मित कॉस्मेटिक ₹ ३९,६९,९४०/-

💥 'या' मोठ्या कारवाया ठरल्या हायलाइट!

'मेड इन पाकिस्तान' रॅकेटचा पर्दाफाश: इतवारा भागातून बंदी असलेली 'मेड इन पाकिस्तान' सौंदर्यप्रसाधने जप्त केली. मुंबईच्या कारागृहातून मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेत राज्यभरात पसरलेले हे रॅकेट उद्धवस्त केले.

अल्पवयीन मुलांची सुटका व शोध: अपहरण झालेल्या १९ मुली आणि १ मुलाचा सुरक्षित शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच बेपत्ता असलेल्या २९ महिला व २२ पुरुषांना शोधून त्यांच्या कुटुंबांच्या स्वाधीन केले.

मानवी वाहतूक व आंतरराज्य रॅकेटवर प्रहार: मानवी तस्करीप्रकरणी २ गंभीर गुन्हे दाखल करत १३ जणांवर कठोर कारवाई केली. याशिवाय पंजाब राज्यातील अमली पदार्थांची तस्करी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि सायबर फसवणुकीतील 'म्यूल अकाउंट'च्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

४७१ गहाळ मोबाईल परत: नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल ४७१ मोबाईल शोधून काढून ते मूळ मालकांना परत मिळवून दिले.

⚖️ 'ट्रायल मॉनिटरिंग सेल'ची अनोखी संकल्पना

न्यायालयीन खटल्यांमध्ये प्रभावी तपास आणि भक्कम पुरावे सादर करून गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी डॉ. निलाभ रोहन यांनी 'ट्रायल मॉनिटरिंग सेल'ची स्थापना केली आहे. यामुळे माळाकोळी, हिमायतनगर, नांदेड ग्रामीण हद्दीतील अत्याचाराची गंभीर प्रकरणे आणि किनवट येथील पत्नीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणांत आरोपींना न्यायालयाने तत्परतेने कठोर शिक्षा सुनावली आहे.

🛡️ सुरक्षा अन् जनजागृतीवर भर

केवळ दंडात्मक कारवायांवर न थांबता एसपी डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.

पहिल्याच महिन्यात एसपींच्या या 'ॲक्शन मोड'मुळे गुन्हेगार बॅकफूटवर आले असून, सामान्य नांदेडकरांमधून तीव्र समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया द्याय्य (Comments)

No comments:

Post a Comment

तक्रार नोंदवा